उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान ज्या नवाब मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला तेच नवाब मलिक मंगळवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीत उपस्थित होते. आता मलिक पुन्हा अजित पवारांच्या सोबत आल्यानं फडणवीस आणि महायुती काय भूमिका घेणार या प्रश्नानं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. आता त्याच नवाब मलिकांची अजित पवारांना का गरज भासलीय? यामागे नेमकं राजकारण काय? फडणवीस यांना आता हे चालणार आहे का? असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे. यासंबंधीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत
सुरवातीला महाविकास आघाडीचे सरकार असताना नवाब मलिक हे मंत्रिमंडळात होते त्यावेळी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप २०२१ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पुढे मनी लॉन्ड्रींग प्रकरणी नवाब मलिकांना तुरुंगात जावे लागले होते. सध्या ते वैद्यकीय उपचारासाठी जामीनावर असून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिक कोणत्या राष्ट्रवादीसोबत जाणार अशी चर्चा रंगली असतानाच हिवाळी अधिवेशनात आपण सत्ताधारी राष्ट्रवादीसोबत असल्याचं मलिकांनी दाखवून दिलं होतं. त्यावरून फडणवीस आणि अजित पवारांमध्ये पत्रांचा खेळ रंगला होता. आता पुन्हा एकदा मलिकांवरून महायुतीत राजकारण रंगल्याचं दिसून येतंय. मंगळवारी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी या बैठकीला आमदार नवाब मलिकांनी हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यामुळे महायुतीत नाराजीचे सूर पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. पण देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीमुळे अजित पवारांनी नवाब मलिकांना सोबत घेण्याचा निर्णय आता लपून राहिलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलून अजित पवारांना मलिकांची एवढी राजकीय गरज का भासली. तर या मागचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा जिंकता आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीसोबत अर्थात भाजपा बरोबर गेल्यामुळं मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दूरावल्याचं बोललं जातंय. अशातच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत अजित पवारांनी आपले दोन उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका एका आमदारांचं मत महत्वाचं असल्यानं आता अजित पवारांना नवाब मलिकांची गरज भासली आहे. ती इतकी आहे की नवाब मलिक तुमच्या पक्षात आले का? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला तेव्हा तुम्हाला काही अडचण आहे का? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी पत्रकारांनाच केला. तर दुसरीकडे ‘मी काही बोलणार नाही मला कोर्टाची मीडिया समोर बोलण्यास मनाई आहे.’ असं म्हणत नवाब मलिक यांनी या बैठकीवर मौन बाळगलं. या बैठकीत पक्ष विस्तार याबाबत चर्चा झाल्याचं समजतंय त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच येत्या काळात आपल्या पक्षाचा विस्तार होणार आहे.. तो कसा. हे लवकरच सगळ्यांना कळेल असं वक्तव्य केलंय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर नवाब मलिकांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीत दूर गेलेल्या मुस्लिम मतदारांना पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जातोय का? नवाब मालिक पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा देणार का? यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत