काल 12 जुलै रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. आपले उमेदवार विजयी व्हावे यासाठी सर्वच पक्षांनी ताकत लावली होती. त्यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. यात, भाजपचे योगेश टिळेकर,परिणय फुके, अमित गोरखे, पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत असे 5 तर,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने आणि भावना गवळी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे महायुतीचे सर्वच 9 उमेदवार निवडून आले.
महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सताव यांचा विजय झाला परंतु,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुरस्कृत उभारलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. परंतु,यामध्ये काँग्रेसची सात ते आठ मत फुटल्याने,काँग्रेस आता ॲक्शन मोडमध्ये आलीये. दरम्यान, या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांना ओळखण्यासाठी एक सापळा रचला गेला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.आता यात अडकलेल्या आमदारांवर कारवाई होणार असल्याचे ही पटोले म्हणाले.
काय म्हणाले नाना पटोले?
आम्ही या निवडणुकीत ट्रॅप लावला होता आणि यात काही आमदार सापडलेले आहेत, आम्ही वरिष्ठांना या संदर्भात सर्व कळवलेले आहे. या आधी विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये चंद्रकांत हंडोरे हे उभे होते तेव्हा ही असाच प्रकार झाला होता. परंतु, यावेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या निवडणुकीत शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव झाला. यात काँग्रेसची 7 ते 8 फुटल्याचं स्पष्ट झालं.यामध्ये कोणी कोणी क्रॉस व्होटिंग केली यांची माहिती काँग्रेसकडे आहे. त्यामुळे, लावण्यात आलेल्या ट्रॅपमध्ये क्रॉस व्होटिंग केलेले आमदार सापडले आहेत अशा पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्यांना लवकरच बाहेरच रस्ता दाखवला जाईल आणि त्यांचावर अश्याप्रकारची कारवाई जाईल की, पुन्हा कोणी असं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता ते सापडलेले कोण आमदार आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.