लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि पर्यायाने भाजपला महाराष्ट्रात चांगलाच धक्का बसला. देशात महायुतीची सत्ता आली असली तरीही महाराष्ट्रात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा केवळ 9 जागा मिळवता आल्या. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नुकतीच पार पजलेली विधानपरिषदेची निवडणूक भाजपसाठी अतिशय महत्त्वाची होती.या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपनं पाच जागा लढवल्या आणि पाचही जागांवर विजय मिळवला.
विधान परिषदेसाठी भाजपनं पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. हे पाचही उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत भाजपनं या ५ जणांना आमदार करत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सामाजिक आणि भौगोलिक संतुलन राखल्याचं पहायला मिळतंय. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांचा ‘माधव’ पॅटर्न भाजपनं परिषदेच्या निवडणुकीत राबवला. लोकसभेत भाजपची झालेली वाताहत पाहता पक्षानं विधानसभेआधी हा प्लान ऍक्टिव्ह केल्याचं यावरून बोलता येतंय.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा भागांमधील नेत्यांना आमदार करत भाजपनं भौगोलिक समतोल राखला आहे. विधानसभेपाठोपाठ लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना भाजपनं परिषदेवर संधी दिली. पंकजा मुंडे वंजारी समाजातून येतात. त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे मराठा आंदोलनांने जोर धरलेला असताना भाजपनं मुंडेंना आमदार करून ओबीसी समाजाला पुन्हा एकदा आपल्याकडे बळवण्याचा प्रयत्न केल्याचं बोलता येतं.
दुसरीकडे भाजपच्या योगेश टिळेकर यांनीही विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवला. योगेश टिळेकर पुण्याच्या हडपसरचे माजी आमदार आहेत. ते २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चेतन तुपेंकडून पराभूत झाले होते. सध्ये चेतन तुपे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हडपसरची जागा राष्ट्रवादीकडे जाईल. अशा परिस्थितीत भाजपनं टिळेकरांना परिषदेवर घेत संभाव्य संघर्ष टाळला आहे. शिवाय योगेश टिळेकर माळी समाजातून येतात. ओबीसींमध्ये माळी समाजाचं प्रमाण मोठं आहे. सोबतच भाजपनं अमित गोरखेंना परिषदेवर संधी देऊन मातंग समाजाला प्रतिनिधीत्व दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाची चर्चा होती. ती भाजपला महागात पडली. मागासवर्ग भाजपपासून दुरावला. आता गोरखेंना उमेदवारी देत भाजपनं मागासवर्गीयांना साद घातली आहे.
शिवाय भाजपकडून विधानपरिषदेवर निवडूण गेलेले चौथे उमेदवार आहेत परिणय फुके. परिणय फुके कुणबी समाजातून येतात. फुके भंडारा-गोंदियातून लोकसभा लढवण्यास उत्सुक होते. पण त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. आता त्यांची परिषदेवर वर्णी लावली आहे. याआधी त्यांना 2016 साली विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यांनी साकोलीमधून नाना पटोलेंविरोधात विधानसभा लढवली. पटोलेंनी त्यांचा पराभव केला. यंदा भाजपनं लोकसभेत भंडारा-गोंदियाची जागा गमावली. विदर्भात पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या. त्यामुळे आता फुके यांच्या रुपात विदर्भाला परिषदेत प्रतिनिधीत्व देण्यात आलं आहे.
सोबतच भाजपनं विधानपरिषदेवर सदाभाऊ खोत यांनाही संधी दिली आहे. रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देत भाजपनं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा समाज असं समीकरण साधलं आहे. खोत शेतकरी नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून ते महत्त्वाचे नेते आहेत. लोकसभेला भाजपला पश्चिम महाराष्ट्रात केवळ दोन जागा मिळाल्या. सातारा, पुणे वगळता बाकीच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या. त्यामुळेच खोत यांच्या रुपात भाजपनं पश्चिम महाराष्ट्रातील चेहऱ्याला परिषदेत स्थान दिलं आहे. त्यामुळं यंदाच्या विधानपरिषदेत भाजपनं पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या पाच जणांना संधी देऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सामाजिक आणि भौगोलिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट होतंय.