आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोकं करत असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केला होता.
राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी छत्रपत्री संभाजीनगर येथे भव्य शांतता रॅलीमध्ये सरकारला २० जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्याकडून टोकाची विधाने केली जात असताना बारामतीत आयोजित जनसन्मान मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करत शरद पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. आणि आता त्यानंतर राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे अचानक शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक वर दाखल झाले आहेत.
छगन भुजबळ यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असं छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं नाव न घेता म्हटलं होतं. आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.