महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्यासा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे. याचसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही एक महिन्यानंतर अर्थात 17 ऑगस्टला या योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिला हफ्ता बँकेत जमा व्हायला वेळ लागणार असला तरी आता सरकारकडून जुलै महिन्याचे पैसेही खात्यात जमा केले जाणार आहेत.
दरम्यान, आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिण योजने प्रणामेच लाडका भाऊ योजनेचीही घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 12 वी पास मुलांच्या खात्यात 6 हजार, डिप्लोमाधारकांच्या खात्यात 8 हजार तर पदवीधारकांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निव़णुकीच्या दृष्टीने सरकारकडून सध्या योजनांचा पाऊस पाडत असल्याचं पहायला मिळत आहे.