लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे झालं ते विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून भाजपाने चांगलीच कंबर कसलीय. मुंबईत १८ जुलैला भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीची दुसरी बैठक पार पडली… या बैठकीला केंद्रीय नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित होते. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या सर्व मतदार संघांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.. भाजपाने विधानसभा निवडणुकीला १७० ते १८० जागा लढवाव्यात असं वरिष्ठ राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे.. पण जर भाजपाने १७० ते १८० जागा लढवल्या तर महायुतीमधील दोन घटक पक्षांना किती जागा मिळाणार? महायुतीतील दोन घटक पक्ष इतक्या कमी जागा घेऊन लढतील का…? असे प्रश्न देखील उपस्थित होतात.. याच अनुषंगानं आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत..
भाजपाची मुंबईत १८ जुलैला बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. भाजपा किती जागांवर लढू शकतो आणि त्यातल्या किती जागा जिंकू शकते. यावर चर्चा करण्यात आली. सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो? लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाची कसर जास्तीत जास्त कशी भरून काढता येईल? यावर देखील या बैठकीत चर्चा झाली. यावेळी पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी महायुतीत भाजपाने १७० ते १८० जागा लढवल्या पाहिजेत. जेवढ्या जास्त जागा लढू तेवढा जास्त फायदा होईल असं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी वरिष्ठ नेत्यांनी देखील याला दुजोरा दिल्याचं समजतंय. पण जर का भाजपाने एकट्यानं १७० ते १८० जागा लढवल्या तर शिवसेना व राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याबाबत शंका उपस्थित केली जातेय. लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटपाची चर्चा बराच काळ चालू राहिली यामुळे जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालल्यानं उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला. परिणामी प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. लोकसभेला झालेली चूक विधानसभेला टाळावी असं देखील बैठकीत ठरवण्यात आलं.