आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील नेत्यांचं पक्षांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे. विधानसभेला तिकिट मिळावे यासाठी अनेकजण पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतराचा भाजपाला फार मोठा फटका बसतोय. त्यातच भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भाजपाला रामराम केला आहे. त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला आहे. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिशुपाल पटले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिशुपाल पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारामधील भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो. परंतु आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत आजून कोणतीही माहिती समोर आली नाहीये.
भंडारा,गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात शिशुपाल पटले हे पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करीत होतो. मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्ष नेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नासाठी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी म्हटले आहे. पक्षगळतीमुळे भाजपाला विधानसभेला फटका बसणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.