“मी पुणेकरांना विनम्र विनंती करते, आपण आपल्या परीने कपडे, ब्लँकेट अशी काहीतरी मदत करूयात. माझी कलेक्टर आणि पालिका आयुक्तांना विनंती आहे की, तुम्ही सुद्धा लोकांकडे अपील करा. मी अपील करते. आम्ही तर सुरु केलेलंच आहे. तुम्ही कपडे किंवा धान्य आम्हाला मदतीसाठी दिलं तर आम्ही प्रामाणिकपणे ती मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवू”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना केलं आहे. “शेवटच्या माणसापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल. महायुती सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. युद्ध पातळीवर काम चाललं पाहिजे. पुढच्या आठ दिवसांत वेगळा कॅम्प या ठिकाणी लावला जाईल. मुलांची सर्व कागदपत्रे बनवले जातील. आम्ही अन्नधान्यासाठी सर्वच काम करतोय. रात्रीही काल जेवण, पाणी पोहोचवण्यासाठी आमचे सर्व सहकारी काम करत आहेत. हे परत होता कामा नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे”, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “आता राजकारण करायचं नाही, आपली लोकं अडचणीत आहेत, लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलो आहोत. राजकारणासाठी खूप वेळ आहे. कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांनीदेखील जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पुन्हा एकदा स्थानिकांवर संकट आलं आहे. या संकटामुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. महिला रडत आहेत. मुलांच्या परीक्षा असतील, मुलांचे कागदपत्रे असतील, आताच एक महिला मला सांगत होती की, तिने कर्ज काढून फर्निचर केलं होतं. पण सारं उद्ध्वस्त झालं. याला जबाबदार कोण? अर्थातच हे महाराष्ट्राचं सरकार”, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनके ठिकाणी पूल पाण्याखाली गेले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. अनके घरातील सामान भिजले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या सर्व नागरिकांना मदत करण्याचं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.