महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना आता महायुतीतील मित्रपक्षांमध्ये स्थानिक पातळीवर रस्सीखेच पहायला मिळतेय. याची झलक सध्या मावळ विधानसभा मतदारसंघातून समोर आलीये. मावळमध्ये सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके विद्यमान आमदार आहेत. मात्र, हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्या कारणाने भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवी भेगडे यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मावळचे माजी आमदार संजय (बाळा) भेगडे देखील यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं समोर आलंय.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळचे स्थानिक राजकारण तापायाला सुरुवात झाली आहे. रवी भेगडे हे सुरुवातीपासून भाजपचे एकनिष्ठ नेते आहेत. बाळा भेगडे, सुनील शेळके आणि रवी भेगडे हे मावळचे प्रमुख नेते भाजपमध्ये होते. 2019 साली विधानसभा निवडणूक लढवण्यास हे तिनही नेते इच्छुक होते. मात्र, अखेरच्या क्षणी उमेदवारी बाळा भेगडे यांना देण्यात आली. त्यातूनच सुनील शेळकेंनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. शिवाय रवी भेगडे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणुकी अगोदर रवी भेगडे यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी भेगडे यांनी बाळा भेगडे यांना जाहीर पाठिंबाही दिला होता.मात्र, या निवडणुकीत सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंचा पराभव करत विजय मिळवला.
2022 साली महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर सध्या मावळमधील हे तिनही नेते महायुतीत आहेत. शिवाय तिनही नेते आगामी विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. यापैकी सुनील शेळके विद्यमान आमदार असल्यानं महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर शेळकेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. तर, रवी भेगडे यांनी 2 दिवसापूर्वीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यासाठी रवी भेगडेंनी आवश्यक तयारीही सुरू केल्याचं त्यांचे कार्यकर्ते सांगतात. दुसरीकडे मात्र, मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पहायला मिळतंय. यासंदर्भात बाळा भेगडे यांच्याशी फॉर द पीपल न्यूजनं संपर्क साधला असता विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया बाळा भेगडे यांनी दिली. मात् येणाऱ्या काळात वरिष्ठांकडून हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो आणि कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणे माहत्वाचे ठरणार आहे.