मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी यांनी स्वीकृती शर्मा या आता राजकारणात एन्ट्री करणार आहेत. नुकतंच स्वीकृती शर्मा यांनी मलबार हिल परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. स्वीकृती शर्मा या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्नवभूमीवर स्वीकृती शर्मा यांच्या ताफ्यात 50 गाड्या, 25 बसेस आणि 100 हून जास्त बाईक्सचा समावेश होता. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत स्वीकृती शर्मा या शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची देखील शक्यता आहे.
प्रदीप शर्मा यांनी 2019 साली शिवसेनेकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ॲंटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्मांच्या नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या राजकारणात एन्ट्री करणार असून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. कार्यकर्त्यांसह त्यांच्या गाड्यांचा ताफा मलबार हिलमध्ये पोहोचल्यानंतर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. याच कारणांतून आता प्रदीप शर्मा पुन्हा चर्चेत आले आहेत.
स्वीकृती शर्मा अंधेरी पूर्वमधून निवडणुकीच्या रिंगणात?
प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे तिकीट हे निश्चित मानलं जातंय.