नवी मुंबई । भाजपमध्ये अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत.अशात नवी मुंबईतील भाजपा नेत्यांचा वाद आता विकोपाला गेला आहे. आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बेलापूर विधानसभेत सद्या भाजपकडून मंदा म्हात्रे आमदार आहेत. यानंतरही संदीप नाईक यांनी याच विधानसभेत कार्यालयाचे उद्घाटन करून आमदारकीची तयारी सुरू केली आहे. हाच धागा पकडत आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना सज्जड दम दिला. ‘तुझ्या बापाला हरवले आहे तू कोण?’ असा उल्लेख भर भाषणात केला. तर याला उत्तर देताना विरोधक किती ही बोलू देत आपण काम करत राहणार असा पलटवार संदीप नाईक यांनी केला.मात्र या टीका टीपणीमुळे नवी मुंबई भाजपात सर्व काही सुरळीत नसल्याचं स्पष्ट होतंय.
नेरुळ येथील सेक्टर १० मध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी सीसीटीव्ही उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेधडक भाषण केले. आपल्या भाषणात कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कोणाकडे आहे हे उघड सत्य आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वपक्षाच्याच स्थानिक नेत्यांना नाव न घेता इशारा दिला आहे.आमदार म्हात्रे आणि गणेश नाईक यांचे राजकीय वैर नवी मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र त्यामुळे राज्य पातळीवरील भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे विजय नाहटा यांची नावं आघाडीवर आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी आतापासूनच भाजपात अंर्तगत वाद वाढत असल्याचं दिसून येत आहे.