महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या अशा दोन याचिकांवर या दोन महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात जागावाटपासाठी रणनीती आखली जात आहे. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम सुनावणी घेऊन निकाल देणं अनिवार्य राहणार आहे. नुकतीच सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीशांनी तुम्हाला अपात्र का ठरवू नये असा सवाल अजित पवार गटाला केला आहे. तसेच नोटीस बजावत उत्तरही मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ३० जून २०२३ रोजी फूट पडली. त्याच दिवशी दोन्ही गटाकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात आला.. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला… निवडणूक आयोगानं 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर 6 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय सुनावला. निवडणूक आयोगाने निर्णय देताना तीन कसोट्यांचा विचार केला. एक म्हणजे पक्षाच्या घटनेची उद्दिष्टं आणि लक्ष्यं, पक्षाची घटना आणि तिसरी म्हणजे बहुमताची कसोटी. पक्षाच्या घटनेची उद्दिष्टं आणि लक्ष्यं यांचं आम्ही पालन करत आहोत आणि दुसऱ्या गटाकडून त्याचं उल्लंघन केलं गेलं असा दावा कोणत्याही पक्षाकडून केला गेला नाही. त्यामुळे ती कसोटी या प्रकरणात लावण्यात आली नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं. दुसरी कसोटी होती पक्षाच्या घटनेची. पण या प्रकरणी समोर आलेले मुद्दे तपासले. त्यानंतर घटनेची कसोटी लावू शकत नाही असं स्पष्ट केलं. दोन्ही बाजूंकडून घटनेचं उल्लंघन झाल्याचं दिसत आहे, असं कारण निवडणूक आयोगानं दिलं. या दोन्ही कसोट्या रद्दबातल ठरवल्यानंतर आयोगानं संख्याबळाच्या कसोटीचा आधार घेत पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलं. यानंतर शरद पवार यांच्या गटानं सुचवलेल्या तीन नावांपैकी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार ‘ असं नाव त्यांना नवीन पक्षासाठी देण्यात आलं. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली त्याचा निर्णय त्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिला. अजित पवारांच्या वतीने अनिल पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात गेले. तर शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. अजित पवार आणि ४१ आमदारांना ही नोटीस बजावली आहे. तसंच ही विचारणा करण्यात आली आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये? सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसांत लेखी उत्तर सादर करण्याची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अपात्रतेच्या प्रकरणी एकाच दिवशी 3 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे. त्यांनी त्याचवेळी मूळ शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि मूळ राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवारांची असा निकाल दिला. या दोन्ही निकालावरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यातच आहेत. त्यामुळे 3 सप्टेंबरला सुनावणी पूर्ण करुन, 30 सप्टेंबरपर्यंत अपात्रतेचा निकाल लागेल, अशी शक्यता आहे. ३ सप्टेंबरच्या आत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लेखी उत्तर द्यावं लागणार आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी काय घडलं? याची माहिती ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी म्हटलं की, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण यासोबतच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होईल. पण त्याआधी मुंबई उच्च न्यायालयात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल. भरत गोगावले यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर ६ ॲागस्ट रोजी सुनावणी होईल. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिथं उत्तर द्यावं लागेल. चारही पक्षांना आपली बाजू मांडता येईल…सप्टेंबर अखेर पर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. पण यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचं आहे. म्हणून ते उच्च न्यायालयात गेले आहेत, असं ॲड. सिद्धार्थ शिंदे म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रकरणं एकत्र ऐकतो, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीवेळी म्हटलं आहे. दोन्ही प्रकरण एक सारखी आहेत. त्यामुळे ही सुनावणी आम्ही एकत्र ऐकू, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर आला होता. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या विरोधात तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या दोन्ही पक्षांची सुनावणी आता यापुढे एकत्र होणार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपली बाजू मांडावी लागेल…तीच परिस्थिती ठाकरे गट आणि शरद पवार गटाचीही असेल. आता कोणाचे आमदार अपात्र होणार हे स्पष्ट होण्यासाठी आपल्याला सप्टेंबर अखरेपर्यंत वाट पाहावी लागणार असं दिसतंय.