कोल्हापूरातील विशाळगडावर झालेल्या दंगलीला संभाजीराजे छत्रपती यांना जबाबदार आहेत, असं म्हणत त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ठाण्याजवळ जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला. दरम्यान, गाडीवर हल्ला झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतप्त झाले. ” संभाजीराजे छत्रपतींनी दंगल घडवली, छत्रपती शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी केली”,असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘मी त्यांना छत्रपती संभाजी आणि राजे बोलत होतो, पण त्यांनी जी दंगल घडवली आता त्यांना मी त्यांना राजे म्हणणार नाही. हल्ला करणारे तिघेच होते. माझ्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोळ्या होत्या. मी याला हल्ला म्हणणार नाही. सामाजिक एकता या घराण्याने राखली पाहिजे होती. मी अजून त्वेशाने आणि तीव्रतेने बोलेन. स्वतः च्या वडिलांनी तुमचा निषेध केला. आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याशी संभाजींने गद्दारी केली आहे. त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे आम्ही आमचं काम करत राहू, असंही आव्हाड म्हणाले. ‘मी मेलो तरी माफी मागणार नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी त्यांच्यामुळे मशीद तोडली गेली. ते आरोपी आहेत, आरोपी नंबर एक संभाजी आहे. मी वाईट वैचारिक लढाई सोडणार नाही. माझी कोणाविषयी तक्रार नाही. शिव, शाहू, आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही जगतो आणि मरू देखील. असंही आव्हाड म्हणाले.