राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुख, राज्यसभेचे माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्यासह २१ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून नागपूर येथील विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. आणि त्यासंबंधी सर्व संशयितांना ३० ऑगस्ट रोजी हजर राहण्याची नोटीस न्यायालयाने बजावली आहे. आता माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि त्यांचा मुलगा आमदार मनीष जैन यांचावर नेमका काय आरोप आहे? ईडीकडून त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली? आणि नेमकं हे प्रकरण काय? हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात…
ईश्वरलाल जैन हे जळगाव मधील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुख तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते 15 वर्ष खजिनदारही होते. त्यांचे पूत्र मनीष जैन हे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी आमदार राहिले आहेत आणि राजमल लखीचंद ज्वेलर्सचे ते संचालकही आहेत. राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या मुंबई, जळगाव, नाशिक आणि ठाणे या ठिकाणी अधिकृत १३ शाखा आहेत. १६५ वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा असलेला राजमल लखीचंद परिवार ईडीच्या कारवाईमुळं सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला मुंबई, नागपूर, संभाजीनगर येथून ईडी पथकाच्या दहा गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. दोन्ही खात्याच्या सुमारे 20 अधिका-यांकडून ही छापेमारी करण्यात आली. एकाच वेळी राजमल लखीचंद समूहाच्या १३ अधिकृत तसेच निवासी परिसराच्या ठिकाणांवर शोध मोहीम राबविली होती. त्यामध्ये ३१५ कोटींची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली. त्यामध्ये विविध कागदपत्रांसह २४.३६ कोटी किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने तसेच १ कोटी १२१ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ईडीच्या पथकाने जळगावमधील या राजमल लखीचंद समूहाच्या ठिकाणांवर धाड टाकत राजमल लखीचंद समूहाचे प्रमुख तसेच शरद पवार यांचे खास सहकारी राहिलेल्या त्यांच्या पक्षाचे माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि त्यांचा मुलगा आमदार मनीष जैन यांचावर कारवाई केली. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. माजी खासदार ईश्वरलाल जैन व त्यांचे पूत्र मनीष जैन यांच्यावर कट, फसवणूक अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सर्व प्रकरणावर सीबीआयकडून ईश्वरलाल जैन व मनीष जैन तसेच संबंधित लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आणि या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने तपास सुरु केला. ईश्वरलाल जैन यांनी बुडवलेल्या कर्जामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला ३५२.४९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ईडीने केलेल्या तपासत ईश्वरलाल जैन यांनी व त्यांच्या भागीदारांनी कर्ज मिळवण्यासाठी बनावट आर्थिक माहिती बँकेला दिली. बँकेच्या संमती शिवाय कर्जाविरुद्ध गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे काही भाग त्यांच्याकडून विकण्यात आले. घेण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेची कोणतीही पडताळणी बँकेकडून होऊ नये यासाठी कंपन्यांशी संबंधित सदोष डेटा देखील नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले. याशिवाय कंपन्यांच्या खाते पुस्तकांमध्ये कंपन्यांच्या लेखापरीक्षकांच्या आधारे विविध व्यवहारासंबंधीची कागदपत्रे, रकमा, गुंतवणूक, कर्जाच्या रकमा आपल्या सोईनुसार नोंदविण्यात आल्या. याच कारवाईप्रकरणी आता नागपूरच्या विशेष न्यायालयाने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन व मनीष जैन या पिता-पुत्राला व संबंधितांना ३० ऑगस्टला न्यायालयासमोर हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता न्यायालयात या संबंधी काय निर्णय होतो आणि दोषींवर काय कारवाई होते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.