शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. आज पुण्यात पक्षाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस,नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. विशेषतः देवेंद्र फडणीवस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती प्रहार केले. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष “मी ढेकणाला आव्हान देत नाही” ढेकणाला बोटानं चिरडलं जातं. ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत तणावात जगत आहेत आणि त्या तणावामुळे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, याच्यावर आपण काय उत्तर देणार? एखादा व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करुन अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासह देवेंद्र फडणवीस यांना सचिन वाझे यांच्या आरोपाबद्दल विचारणा करण्यात आली. यावर फडणवीस म्हणाले, सचिन वाझे यांनी मला जर पत्र पाठवलं असेल तर मी ते अद्याप पाहिलेलं नाही. मी देखील माध्यमांद्वारे ही बातमी दाखवली आहे. मी नागपुरात आहे. त्यामुळे मला याबद्दल काही कल्पना नाही. त्यामुळे त्या पत्रात नेमकं काय आहे. त्यात काय लिहिलं आहे हे पाहून त्यावर प्रतिक्रिया देईल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.