शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. आज पुण्यात पक्षाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस,नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. विशेषतः देवेंद्र फडणीवस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती प्रहार केले. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष “मी ढेकणाला आव्हान देत नाही” ढेकणाला बोटानं चिरडलं जातं. ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला. यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. फडणवीस यांच्याविरोधात जेवढं बोलाल तेवढं ते पुढे जातील, असंही गिरीश महाजन म्हणाले. देवेंद्रजींनी झपाट्याने काम केलं. म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम केलं. किती खालच्या थराला जात आहात. सकाळ झाली की देवेंद्रजीच दिसतात. एवढंच काम उरलं आहे. ते जेवढ्या शिव्या घालतील तेवढे देवेंद्रजी पुढे जातील. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. कितीही शिव्या दिल्या तरी फरक पडणार नाही. पुढचा काळ आपलाच आहे, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरात बसले. कोरोना संकट असताना उद्धव ठाकरे यांनी एकाही हॉस्पिटलला भेट दिली नाही. आता खालच्या थराचे आरोप करत आहेत. किती अर्वाच्च भाषेत बोलावं याला काही लिमिट राहिली नाही. संजय राऊत तर शिवीगाळ शिवाय बोलतच नाही, असा संताप महाजन यांनी व्यक्त केला. दरम्यान ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत तणावात जगत आहेत आणि त्या तणावामुळे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, याच्यावर आपण काय उत्तर देणार? एखादा व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करुन अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.