लोकसभेला महायुतीला सर्वात जास्त फटका हा मराठवाड्यातून बसला. मराठवाड्यात महायुतीचे ८ पैकी ७ उमेदवार पडले. आणि यापाठीमागे ‘मनोज जरांगे फॅक्टर’ असल्याचं बोललं गेलं. कारण मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मनोज जरांगे यांना मराठवाड्यातून मिळाला. आता भाजप मधील काही नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली त्यामुळे भाजपमधील नेते आक्रमक झाले आहेत. नारायण राणे यांनी देखील जरांगेंना इशारा दिला. देवेंद्र एकटा नाही, आम्ही सगळे भाजप त्यांच्या सोबत असल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला. मराठवाड्यात येतोय बघू जरांगे काय करतो असं नारायण राणे म्हणाले दरम्यान यावर आता मनोज जरांगे यांनी प्रति उत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मी नारायण राणे यांच्यावर टीका केली नाही. त्यांनी आरक्षण दिले होते, म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही त्यांना दादा म्हणतो. तुम्हाला शेवटचे सांगतो, माझ्या नादी लागू नका. जी वळवळची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला पश्चाताप होईल आणि मी तुला तुम्हाला एक शेवटची संधी देतो. तुम्ही नीट शहाणे व्हा” जरांगे यांनी असा इशारा नारायण राणेंना दिला आहे. ते पुढे म्हणाले, “राणे पिता-पुत्राला दोष द्यायचे काही कारण नाही, हे सर्व देवेंद्र फडवणीस करत आहे. देवेंद्र फडणवीस मराठयांच्या काही लोकांना रोज तुकडे फेकतो. मी जातीचे काम करतो म्हणून माझ्यावर हे लोक सोडले आहेत. देवेंद्र फडवणीस यांना मराठ्यांमध्ये वाद घडवून आणायचे आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच फडवणीस यांचे ऐकून जे बोलत आहेत, त्यांना लोक धडा शिकवतील आणि पळता भुई कमी होईल. आणखीही फडवणीस यांनी विचार करावा तुझे काय होऊ शकते. दरेकर आणि फडवणीस यांनी रचलेले हे अभियान आणि ट्रॅप आहे आणि राणेंसह इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही” असं ही मनोज जरांगे पाटील म्हणाले. “हे सर्व मराठ्यांच्या विरोधातील ढाकू माकू आहेत. फडवणीस सुफडे साफ करण्याच्या दिशेने निघाले आहेत. राणेंना लक्षात येणार नाही, मी जातीसाठी करतो आणि तुम्ही फडणवीसांसाठी करतात, 96 कुळी मराठे काय असतात हे तरी माहीत आहे का?” असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना केला आहे.