विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलीय. त्यामुळं अनेकजण तिकिट मिळावं म्हणून पक्ष नेतृत्वाच्या भेटी घेत आहेत… त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आता लोकसभेला बारामतीत जसा आपण पवार विरुद्ध पवार अशी एकाच घरात नणंद विरुद्ध भावजय मध्ये झालेली लढत बघितली… तशाच प्रकारच्या लढती येणाऱ्या विधानसभा मतदार संघात अनेक मतदार संघात पाहायला मिळतील असं सध्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कुठं कुठं अशा लढती होऊ शकतील? हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत…
लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्वी पवार घराण्यात फूट पडली. अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेच्या महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी मात्र, त्यास विरोध दर्शविला. परंतु, अजित पवार त्यांच्या समर्थक ४० आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत आपल्याला बघायला मिळाली. आता हाच प्रकार विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदार संघात बघायला मिळेल असं चित्र दिसतंय. विशेष म्हणजे शरद पवारांना सोडून गेलेल्या काही आमदारांच्या विरोधात त्यांच्याच घरातील उमेदवार इच्छुक असल्याची बाब समोर येतेय… अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार यांच्यावर घरफोडीचे आरोप केलेत… गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मदारसंघाचे धर्मरावबाबा आत्राम हे आमदार आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. शरद पवार हे ८२ वर्षांचे आहेत. त्यांनी नेहमीच फोडाफोडीचं राजकारण केलं. घरफोडीचं राजकारण असो… कोणाला निवडणुकीत पाडायचं असो… पक्ष कसा फोडायचा हे त्यांना चांगलं माहित आहे. फोडाफोडीचं राजकारण हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलोय अशा शब्दांत आत्राम यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय. आता या टीके मागचं कारण म्हणजे धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अहेरी विधानसभेसाठी तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघातून वडील विरुद्ध मुलगी असा सामना होऊ शकतो. याबरोबरच माढ्यातून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे सख्खे बंधु यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे हे देखील माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर रमेश शिंदे त्यांचा मुलगा धनराज शिंदे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बबन शिंदे हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळं त्या मतदारसंघात शरद पवारांना विधानसभेसाठी उमेदवार पाहिजे. त्यामुळे रमेश शिंदे यांनी ही संधी साधत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट मिळेल अशी आशा रमेश शिंदे यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून बबन शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून रमेश शिंदे यांच्या मुलाला उमेदवारी दिली तर माढ्यात भाऊ विरुद्ध भाऊ असा सामना पाहायला मिळेल.