अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. जनसन्मान यात्रा असो किंवा पक्षात नवीन तरुणांना संधी देणं असो अशाप्रकारे अजित पवार आपल्या पक्षाची बांधणी करत आहेत. त्यातच अजित पवार यांनी रोहित पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांनी नवीन खेळी केली आहे. कर्जत जामखेडवर अजित पवारांचं प्रेम आणि लक्ष राहिलं आहे. कर्जत जामखेड मधून अजित पवारांनी संध्या सोनावणे यांना पक्षात मोठी संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांना आगामी काळात संध्या सोनावणे त्यांना आव्हान देतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या सोनावणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नावाची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं. जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या त्या सदस्य आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे वर्चस्व आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा ४३,३४७ मतांनी पराभव केला. रोहित पवार निवडणुकीत विजयी व्हावे यासाठी अजित पवारांनी फार मेहनत घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यांनंतर त्यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता मात्र अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये सामना पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे.
संध्या सोनावणे यांनी २०१८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. विद्यार्थींसाठीच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन देखील केले आहे. २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष पद दिले होते. त्यांनतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवतीची स्थापना केली तेव्हापासून संध्या सोनावणे संघटनेमध्ये सक्रिय होत्या. राष्ट्रवादी फुटीनंतर संध्या सोनावणे यांनी शरद पवारांची साथ सोडली. जामखेड तालुक्यामधून सर्वात आधी संध्या सोनावणे यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांची साथ धरली. त्यांनतर २०२२ मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी विद्यार्थी पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून संध्या सोनावणे यांची निवड केली.