आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असले तरी काँग्रेसने विधानसभेच्या सर्व २८८ जागांसाठी चाचपणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं. राज्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला. मात्र असं असून देखील विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटले. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली. या गोष्टी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आतापासूनच सावध भूमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमध्ये नेमक्या काय हालचाली वाढल्या आहेत ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने काँग्रेसला मोठं बळ मिळालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ज्या ठिकाणी विद्यमान खासदार होते ती जागा त्या पक्षाने लढवावी ही भूमिका काँग्रेसची होती, मात्र विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झाल्याने याच मुद्द्यावरून काँग्रेस विधानसभा निवडणुकीला ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे त्या ठिकाणी त्याला पुन्हा तिकीट द्यायचं की नाही याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेणार आहे. काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांची चाचपणी केली जाणार आहे. त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल… शिवाय प्रत्येक मतदार संघाचा सर्व्हे ही केला जाणार आहे. त्यानंतर तिकीट देण्याचा निर्णय घेतला जाईल. जर एखाद्या आमदाराबद्दल नकारात्मक अहवाल आला तर त्याला तिकीट नाकारलं जाईल. त्यासाठी काँग्रेस आपला अंतर्गत सर्व्हे करणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची आतापासूनच धाकधूक वाढली आहे. जे आमदार निष्क्रिय आहेत. पाच वर्षात आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत. रखडलेली विकासकामं पूर्णत्वास नेली नाहीत. ज्या आमदाराविरोधात जनतेच्या मनात रोष आहे. जनता नाराज आहे. अशा आमदाराला घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. यासह विधानपरिषद निवडणुकीत ज्या आमदारांनी बेईमानी केली त्यांचा ही पत्ता कट केला जाण्याची शक्यता आहे.