लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार असं एकूण चित्र दिसतंय. त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तीन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करण्यात आलीय. तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आता शरद पवार यांनी अशा २० जागा हेरल्या आहेत ज्या त्यांच्याच पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात आणि शरद पवार त्या २० जागांवर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्या २० जागांपैकी सर्वाधिक जागा या जिथं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यापासून शरद पवार त्यांना धोबीपछाड देताना दिसतायत. त्यामुळं हा देखील एक नवा डाव शरद पवार यांनी अजितदादांवर टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. या २० विधानसभा मतदार संघामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचे मतदार संघ समाविष्ट आहेत. नेमके हे २० विधानसभा मतदार संघ कोणते आणि कोणाच्या समोर शरद पवार आव्हान उभं करणार आहेत यासंबंधी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ४० पेक्षा जास्त आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. आमदारांचं संख्याबळ कमी असतानादेखील शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत १० जागांवर उमेदवार उभा करून त्यापैकी ८ जागांवर विजय मिळवला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ १ खासदार निवडून आला. शरद पवार यांचे जे ८ उमेदवार निवडून आले त्यातील बहुतांश नवे चेहरे आहेत. त्यामुळं, लोकसभेप्रमाणंच विधानसभेलाही युवकांना संधी देऊन विधानसभेत पाठवण्याची पवारांची रणनीती आहे. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटल्याचंच यातून स्पष्टपणे दिसतं. महाविकास आघाडीतील जागावाटपात आपल्या वाट्याला येतील अशा महत्वाच्या २० विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत शरद पवार आहेत, असं बोललं जातंय. या २० जागांमध्ये धनंजय मुंडेंच्या परळीत, हसन मुश्रीफ यांच्या कागल, दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर, आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघाचा समावेश आहे. पक्ष सोडून गेलेल्या या प्रमुख नेत्यांच्या विरोधात शरद पवार युवकांना संधी देणार आहेत. यासह २० मतदार संघात शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.