विधानसभा निवडणूक अगदी ३ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जागावाटपासाठी महायुती तसंच महाविकास आघाडीमध्ये देखील रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत आहे. महायुतीचा बेसिक फॉर्म्युला असा आहे कि, ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला मिळेल. असं असलं तरीदेखील इच्छुक उमेदवार याला विरोध करत आहेत. आणि याचाच प्रत्यय अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळतोय. अलिबाग विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत नाराजी पाहायला मिळत आहे.
अलिबाग मतदारसंघाचे शिवसेनेचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे बेसिक फॉर्म्युला नुसार या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे परंतु शेकापला रामराम करत दिलीप भोईर यांनी भाजपात प्रवेश केला होता. २ वर्षांपूर्वी भाजपात आलेल्या दिलीप भोईर यांनी अलिबाग मतदारसंघात आणि पक्षात आपलं स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास ते इच्छुक असून पक्षाकडे तशी मागणी देखील केली आहे. आणि याच कारणामुळे अलिबाग मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अलिबाग मध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्वच पदाधिकार्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांच्यावर थेट निशाणा साधला. दिलीप भोईर यांनी माकडचाळे थांबवावेत, महायुतीचा धर्मपाळून काम करावे, अन्यथा शिवसेनाही पेण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करेल असा इशारा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिला. राजा केणी यांच्या टीकेला भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांनी प्रतिउत्तर दिल आहे. आमचा पक्ष वाढवण्याचं काम आम्ही करत आहोत. आम्हाला डिवचू नका नाहीतर तुमची अंडीपिल्ली बाहेर काढू अशा भाषेत सडकून टीका केली आहे. त्यानंतर देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी पुन्हा दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांना तुमचा पक्ष वाढवण्यास आमची हरकत नाही. पण मतदारसंघात शेकापची दुसरी टीम म्हणून काम करू नका अशा शब्दात डिवचलं आहे. शिवसेनेच्या राजा केणी यांनी पेण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा इशारा दिला होता. आता आपण पेण विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडंसं जाणून घेऊया.. रवीशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे बेसिक फॉर्म्युला नुसार हा मतदारसंघ भाजपचा आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या रवीशेठ पाटील यांनी शेकापच्या धैर्यशील पाटील यांचा २४,०८५ मतांनी पराभव केला. त्यामुळे आता अलिबाग मधील भाजप शिवसेना वादाची ठिणगी पेण विधानसभा मतदारसंघात देखील पडू शकते.
आता अलिबाग मतदारसंघाचा इतिहास बघितला तर २००९ च्या विधासभा निवडणुकीत शेकापच्या मीनाक्षी पाटील यांनी मधुकर ठाकूर यांचा २४,१४८ मतांनी पराभव केला होता. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांचा १६,०९४ मतांनी पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांचा ३२,९२४ मतांनी पराभव केला होता. शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षानी आदेश दिला तर पुन्हा निवडणूक लढवू शकतो असं म्हंटल आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बेसिक फॉर्म्युला नुसार शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. पण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने अलिबाग मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता अधिक आहे. अलिबागच्या वादाचा फटका पेण विधानसभा मतदारसंघाला देखील बसू शकतो. यामुळे आता भाजप आणि शिवसेना यावर काय तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.