विधानसभा निवडणूक अगदी तीन महिन्यावर येऊन ठेपलीय. त्यामुळे विविध मतदारसंघात अनेक दिग्गज तयारीला लागलेत. भाजप यावेळी संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचं चित्र आहे. त्यानुसार भाजपमधील ताकदवान नेत्यांनी त्यांच्या इथले अधिकाधिक उमदेवार निवडून आणण्यासाठी व स्वतःसाठी देखील फिल्डिंग लावली आहे. पण हे चित्र एकीकडं असताना दुसरीकडं मात्र भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी, वाद, नाराजी, गटबाजी वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात असं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. सध्या आपण अहमदनगर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी विषयी जाणून घेणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात भाजप आणि महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. पंकजा मुंडे आदींसह दिग्गज तयारीला लागले आहेत. पण गटबाजीमुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. नगर जिल्ह्यातील असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत जिथं पक्षांतर्गत वाद, गटबाजी दिसून येत आहे. हे चार विधानसभा मतदारसंघ नेमके कोणते आणि कोणते पदाधिकारी भाजपचं टेन्शन वाढवू शकतात? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ चांगला चर्चेत आहे. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आहेत. पण यावेळी भाजपमधूनच अनेकजण इच्छूक असल्यामुळे बबनराव पाचपुते यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की खांदेपालट होणार याविषयी जोरदार चर्चा आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पाठोपाठ आता भाजपमधूनच सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या श्रीगोंदा मतदार संघात जनसंपर्क वाढवत आहेत. त्यातच सुवर्णा पाचपुते यांचे “फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार” अशा आशयाचे बॅनर पाहायला मिळाले होते. सुवर्णा पाचपुते यांची गेल्या विधानसभा निवडणुकीतच तयारी झाली होती. मात्र, ऐनवेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो. पण यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालत आहेत. जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णा पाचपुते यांनी केला आहे. त्या अगदी जुन्या भाजप कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. एकनिष्ठ कार्यकर्त्याना यावेळी न्याय मिळेल व तिकीट मिळेल अशी आशा त्यांना आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे. पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे. त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असं कर्डिलेंनी म्हटलं होतं. त्यामुळे या मतदारसंघात भाजपामधूनच मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे इच्छुक नाराज होऊन वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी असं झाल्यास ऐन निवडणुकीत भाजपसाठी हा मोठा डोकेदुखीचा विषय ठरेल. तसेच तिकीट कोणाला द्यायचं याचा तिढा लवकर सोडवणं सोपं ठरणार नाही.