अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आता पुन्हा राज्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुण्यात ही आज पावसाची रिपरिप सुरु आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तर मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अंधेरी, विरार, भाईंदर, ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळं रस्ते वाहतूक मंदावली असून पावसाचा फटका लोकल रेल्वेलाही बसला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रात मात्र उद्या ( २५ ऑगस्ट ) रोजी रविवारी नाशिक जिल्ह्यात तर नंदुरबार, धुळे जिल्ह्यात ( २६ ऑगस्ट ) रोजी सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचा महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी असा परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. तर पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्यात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात घाट परिसरात आजपासून सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.