राज्यात आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग येऊ लागला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरु केली आहे तर काही नेत्यांचे राज्यात दौरे सुरु आहेत त्यातच आता महाविकास आघाडीनेही मुंबईमध्ये सलग तीन दिवस महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे. 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये ही बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोबत आणखीन प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईमध्येच तळ ठोकून राहणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार यांना अनेक आमदार आणि काही पक्षांचे नेते भेटून गेल्याने त्यांना देखील महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत ही निर्णय होणार आहे.
महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अत्यंत सावध भूमिका घेणार असल्याच सांगितलं जात आहे. या बैठकीत जागांच्या अदलाबदली वरही चर्चा होणार असून महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी ही तडजोड करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इतर मित्र पक्षांना उमेदवारी मिळाली नव्हती त्यामुळे या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांसह इतर घटक पक्षांना महाविकास आघाडीकडून जागा सोडल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांची संख्या वगळून इतर जागांबाबत चर्चा होणार असून या विधानसभा निवडणुकीसाठी कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.