राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत काही रस नसल्याची भूमिका मांडल्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिढा आणखीन वाढला आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा लवकर स्पष्ट करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे परंतु, काँग्रेसने याबाबत कोणती भूमिका मांडली नाही. अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात होती परंतु, शरद पवार आणि काँग्रेसकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता आता याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला मुख्यमंत्री पदाबाबत रस नसल्याची भूमिका स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीतील तिढा आणखी वाढल्याचं चित्र आहे.
खरंतर ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असं गणित आहे. परंतु, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा काही लपून राहिली नाही असं दिसतंय. राज्यात सर्वाधिक तेरा खासदार हे काँग्रेसचे निवडून आलेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला देखील आमचे जास्त आमदार निवडून येणार असल्याचे काँग्रेसचे गणित आहे. तर शरद पवार यांनी आपला पक्ष मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसून, आम्हाला फक्त सरकारमध्ये बदल घडवायचा आहे. आम्हाला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी चा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीला पर्याय देण्यावर भर द्यावा’, असे शरद पवार म्हणाले. पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. तसेच सर्वाधिक जागा हे सूत्र असता कामा नये, अशी संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.