आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेतील विविध महत्वाच्या पदांवर नवीन कार्यकर्ते व नेत्यांच्या नियुक्त्या होत आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी मोठं बंड झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोजकेच आमदार व खासदार राहिले. शिवाय पक्ष व पक्षचिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं त्यामुळं उद्धव ठाकरेंना नव्यानंच पक्षाची बांधणी करावी लागणार हे स्पष्टच झालं. त्यानंतर अनेक नियुक्त्या देखील झाल्या. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन महत्वाच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिल्याचं दिसतंय. नेमके हे नेते कोण आहेत? आणि त्यांच्यावर काय जबाबदारी दिली आहे? त्यामुळं उद्धव ठाकरेंना काय फायदा होऊ शकतो? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
बंडानंतर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभेला ९ जागांवर विजय मिळवता आला. त्यांनी २१ जागा लढवल्या होत्या. आता लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्याअनुषंगानंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं युवासेना नेते वरूण सरदेसाई, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सचिवपदी संजय लाखे पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह ललिता पाटील, वसंत मोरे, मुकेश साळुंके यांची पक्षाच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेने नेते वरूण सरदेसाई यांची पक्षाकडून मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.