विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींग केलेल्या संशयित आमदारांच्या यादीत नाव असेलेल्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि आता ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीपासूनच ते पक्षाच्या रडारवर होते. अंतापूरकर हे कधीही काँग्रेस सोडून भाजपात जातील अशी चर्चा होती आणि आता हीच चर्चा खरी ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अंतापूरकरांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अंतापूरकर हे भाजपात जाण्याची शक्यता हा काँग्रेसला अपेक्षित की अनपेक्षित धक्का असेल ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. या आमदारांची नेमकी नावं समोर आली नव्हती. मात्र, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा समावेश होता. जितेश अंतापूरकर कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती. सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडून फुटीर नेत्यांवर कठोर कारवाई होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, काँग्रेस हायकमांडने या फुटीर आमदारांबाबत एक वेगळीच चाल खेळली होती. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश काँग्रेस हायकमांडने स्थानिक नेतृत्त्वाला दिल्याची चर्चा होती. आगामी राजकारणातील हा धोका लक्षात घेऊनच जितेश अंतापूरकरानी भाजपात जाण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जातं.. जितेश अंतापूरकर हे ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत आपण त्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाविषयी देखील जाणून घेऊयात. देगलूर-बिलोली हा मतदारसंघ सीमावर्ती विधानसभा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही त्यामुळे इथे बेरोजगारी ही प्रमुख समस्या असल्याची सातत्याने ओरड होते. देगलूर विधानसभा क्षेत्रात देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हे दोन्ही तालुके तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील शेवटचे तालुके आहेत.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हापासून या मतदारसंघाकडे प्रमुख नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं जातं. हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा 6 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. अंतापूरकर यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन प्रथमच निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत ही रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा 8 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत ही शिवसेनेने साबणे यांनाच उमेदवारी दिली होती. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही रावसाहेब अंतापूरकर विरुद्ध सुभाष साबणे अशीच लढत झाली आणि यावेळी देखील रावसाहेब अंतापूरकरानी सुभाष साबणेंचा 22 हजार मतांनी पराभव केला. या मतदारसंघातील उल्लेखनीय बाब म्हणजे 2009 पासून 2019 पर्यंत अंतापूरकर आणि साबणे हे दोघेच एकमेकांवर मात करत राहिले. पण त्यापुढे चित्र बदललं. रावसाहेब अंतापूरकर यांचं 2022 मध्ये कोरोनामुळे निधन झालं. त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना मैदानात उतरवलं होतं. पण यावेळी इथं भाजपाने चाल खेळली. शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा भाजप प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत अंतापूरकर हे 40 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. जितेश अंतापूरकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ते पदवीधर आहेत. हैदराबादच्या सेंट मेरी इंजिनिअरींग कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलेली आहे. अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जवळचे आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जेव्हा चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून अंतापूरकर देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर अंतापूरकर हे त्यांच्या सोबत दिसून आल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ही अंतापूरकर हे फार सक्रिय नव्हते. त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तक्रार देखील केली होती. क्रॉस वोटिंग केल्याच्या संशयामुळे जितेश अंतापूरकर हे काँग्रेस हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही याबद्दल ते साशंक असल्यानेच पक्ष सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.