आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आल्यानं उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान झालेले हरिभाऊ बागडे यांनी केलंय. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसकडून आव्हानं देणारे कल्याण काळे हे देखील लोकसभेवर निवडून गेले आहेत… यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीत भाजप आणि काँग्रेस पुन्हा आमनेसामने येणार की महायुती आणि महाविकास आघाडीतून इतर घटक पक्षाला ही जागा सुटणार..? यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा त्यांनी १,०९,९५८ मतांनी पराभव केला. याच कल्याण काळे यांना गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात फुलंब्री विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हरिभाऊ बागडे यांचा २,५८७ मतांनी पराभव केला होता. तर, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा ३,६११ मतांनी पराभव केला. त्यानंतरच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही हेच दोघं आमनेसामने होते. त्यावेळी हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळेंचा १५,२७४ मतांनी पराभव केला होता. परंतु २०२४ च्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि त्यांनी सलग पाचवेळा खासदार आणि केंद्रात मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. जगन्नाथ काळे यांनी फुलंब्री मतदारसंघावर दावा केल्याची माहिती समोर आली आहे. जगन्नाथ काळे यांच्या बरोबरच महाराष्ट्र काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष विलास औताडे यांचा मुलगा विश्वास औताडे यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे फुलंब्री मधून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हे निवडणूक लागल्यानंतर जागा वाटपावेळी स्पष्ट होईल…