2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने राज्याचा ‘साखर पट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सहा पैकी पाच जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये मात्र भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या महायुतीचा ‘साखर पट्ट्या’त दारूण पराभव झाला आहे. महायुतीला सहा पैकी चार जागा गमवाव्या लागल्यात. माजी खासदार राजू शेट्टी यानांही दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. पश्चिम महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था प्रामुख्याने उसाच्या नगदी पिकावर अवलंबून आहे. या भागावर एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व होतं. त्यानंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आणि 2019 मध्ये सांगली, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ जिंकले. त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने कोल्हापूर आणि हातकणंगलेची जागा जिंकली, तर राष्ट्रवादीला फक्त सातारा जिंकता आली होती. यावेळी लोकसभेला महाविकास आघाडीतून शरद पवार गट आणि ठाकरे गटाने राज्यातल्या या ‘साखर पट्ट्यात’ चमकदार कामगिरी केली. कोल्हापूर आणि सोलापूरच्या जागा काँग्रेसने जिंकल्या. पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान भाजप खासदार संजय पाटील यांचा पराभव केला. माढ्यात शरद पवार गटाने भाजपचा पराभव केला, तर भाजपला साताऱ्याची जागा जिंकण्यात पहिल्यांदाच यश आलं.
आता आगामी विधानसभा निवडणुकीत साखर पट्ट्यात नेमकं काय होणार? याची चर्चा सुरु आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी ७० जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात. जवळपास राज्यातील २५ टक्के जागा या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच नगर या सहा जिल्ह्यांतून येतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे इथली समीकरणं बदलली आहेत. लोकसभेला साखर पट्टा महाविकास आघाडीला गोड झाला तसा आता विधानसभा निवडणुकीत कोणाला गोड आणि कोणासाठी कडू ठरणार? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील राजकारणाचा महत्वाचा चेहरा मानले जातात. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या या भागात सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून विकास शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचला. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या सात जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या पट्ट्यात ८६ विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये राज्याच्या २८८ मतदारसंघांपैकी जवळपास ३० टक्के जागा आहेत. २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ७० पैकी सर्वाधिक २७ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या तर २० जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेस १२, शिवसेना ८, तसेच इतर पक्षांना ६ जागा मिळाल्या. यंदा लोकसभेप्रमाणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल. यात साखर पट्ट्यातल्या जिल्ह्यांतील सद्यस्थिती काय आहे. कोण वरचढ राहू शकते याचा आढावा घेऊ…