भाजपचे नेते व आमदार नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यातच त्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबायचे नाव घेत नाहीये. मुंबईतील धारावीतील मस्जिद प्रकरणावरून केलेलं वादग्रस्त वक्तव्य ताजं असतानाच काल अमरावतीच्या अचलपूरमध्ये नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. याप्रकरणी, अमरावतीच्या अचलपूर पोलीस ठाण्यात कलम 196 नुसार, दोन धर्मामध्ये कटूता निर्माण होईल, अशी वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली नितेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु याच प्रकरणावरून आता महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार व मंत्री उदय सामंत यांनी नितेश राणेंना घरचा आहेर दिलाय.
अचलपूरमध्ये सुरुवातीला हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर झालेल्या धर्मसभेत नितेश राणे बोलताना म्हणाले, ‘आमची ज्यांच्या विरोधात लढाई आहे, ते किती कडवट आहेत. इस्लाममध्ये लिहलं आहे की, धर्म स्वीकारायला लावा किंवा संपवून टाका. तुम्हाला फसविण्यासाठी ते लोक जय श्रीराम पण बोलतील. आपल्या हक्काच्या लोकांकडून वस्तू विकत घ्या. पण भाईजानकडून घेऊ नका. अचलपूरमध्ये जिहादी लोकांनी आपल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आधी त्यांच्या तंगड्या तोडा व नंतर पोलिसात तक्रार करा’, तसेच तुमच्या मिरवणुकीतून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही असं नितेश राणे म्हणाले. राणेंच्या या विधानामुळे इमरान खान आणि असलम खान यांच्या फिर्यादीवरून अचलपूर पोलीस ठाण्यात नितेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे आमदार व मंत्री उदय सामंत यांना विचारणा केली असता, मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत, नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे की नाही मला माहित नाही. पण, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं योग्य नाही. आम्हाला आजही या संतांच्या मेळाव्यात देखील हेच ऐकायला मिळालं, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.