मुंबई मधल्या घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. परंतु याच भाजपच्या बालेकिल्ल्यात आता त्यांचीच वाट बिकट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून राम कदम हे सलग तीनवेळा विधानसभेवर निवडून जात आहेत. २००९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी मनसे कडून लढवली होती. यावेळी त्यांनी भाजपच्या पूनम महाजन राव यांचा 26,228 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याच्या पुढच्या दोन्ही २०१४ आणि २०१९ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली व ते विजयी देखील झाले. मागील तिन्ही निवडणुकीत राम कदम विजयी होत असले तरी देखील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काहीस वेगळं चित्र पाहायला मिळालं. या मतदारसंघात महायुतीला चांगलाच फटका बसला. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. आणि लोकसभेला याच मतदारसंघातून महाविकास आघाडीमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना ७९ हजार १४२ मतं मिळाली होती तर भाजपाच्या मिहीर कोटेचा यांना ६३ हजार इतकी मतं मिळाली होती. त्यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 29,861 मतांनी पराभव केला होता. लोकसभेचा निकाल पाहता यंदाची निवडणूक राम कदम यांना जड जाण्याची शक्यता अधिक आहे.
आता आपण घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मागील दोन निवडणुकांचा इतिहास बघुयात.. भाजप आणि शिवसेना यांची युती होती परंतु त्यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत झाली होती. भाजपच्या राम कदम यांना 80,343 मतं मिळाली तर शिवसेनेच्या सुधीर मोरे यांना 38,427 मतं मिळाली. या निवडणुकीत राम कदम यांचा 41,916 मतांनी विजय झाला. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राम कदम यांना 70,263 मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार संजय भालेराव यांना 41,474 इतकी मतं मिळाली. यावेळी राम कदम यांनी 28,788 मतं अधिक मिळवत त्यांनी आपला विजय निश्चित केला. त्याचप्रमाणे या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असलं तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, मनसे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसची देखील या मतदारसंघात ताकद बघायला मिळते. यामुळे भाजप समोर आपला बालेकिल्ल्या राखण्याचं आव्हान असणार आहे.