नांदेड जिल्ह्यात यंदाची विधानसभेची निवडणूक अत्यंत चूरशीची होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षातून जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघावर दावा केला जात आहे. अशात मुखेड हा असा विधानसभा मतदारसंघ आहे जो सध्या मोठ्या चर्चेत आला आहे.. त्याला कारण ठरलं आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी खतगावकर हे विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. बालाजी खतगावकरानीं भाजपचे मुखेडचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय. राठोड यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीतून तेच उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात महायुतीतीलच प्रतिस्पर्धी राजकीय आखाड्यात उतरल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आता हे बालाजी खतगावकर नेमके आहेत तरी कोण ? त्यांनी राजकारणात कशी एंट्री केली. त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटण्यामागे राजकीय खेळी की पाडापाडीच्या राजकारणाचा डाव आहे ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
नांदेड मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाडापाडीचं राजकारण पहायला मिळणार आहे. राज्यात युती असली तरी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात भाजपने निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी मतदार संघात तशी तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार असलेल्या मुखेड मतदार संघात शिवसेना शिंदे गटाकडून बालाजी खतगावकर यांनी दंड थोपटलेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात पाडापाडीचं राजकारण होणार की ही राजकीय खेळी आहे अशी चर्चा देखील जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे. बालाजी खतगावकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने भाजप आमदार तुषार राठोड यांचं टेन्शन वाढलं आहे. खतगावकर हे मूळ मुखेड तालुक्याचे रहिवासी नाहीत. त्यांना या तालुक्यात किती ग्रामपंचायती आहेत, किती वाड्या, तांडे आहेत हे सुद्धा माहिती नाही. केवळ दिशाभूल करण्याचं काम ते करत आहेत. याप्रकरणी भाजपच्या नेत्यांकडे आपण तक्रार केल्याचं आमदार तुषार राठोड यांनी सांगितलं. एकूणच खतगावकर यांच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेने राठोड यांचं मात्र टेंन्शन वाढल्याचं दिसून येतंय. आता खतगांवकरांना महायुतीतून तिकीट मिळणार का ? की ते वेगळी भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.