भाजपाच्या वतीने नुकतीच ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर सागर बंगल्यावर म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर नाराजांची लाट उसलळी. अजित पवारांनी नाराजी टाळण्यासाठी आदल्या दिवशी थेट उमेदवारांना फोन केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात एबी फॉर्म दिले असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी आतापर्यंत १८ उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केल्यानं त्यांची नावं निश्चित समजली जात आहेत. एबी फॉर्म मिळालेले पहिले १८ उमेदवार नेमके कोण आहेत आणि त्यांचे मतदारसंघ कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात.
एबी फॉर्म देण्यात आलेल्या नावांमध्ये प्रामख्यानं इंदापूरसाठी दत्तात्रय भरणे यांना फॉर्म मिळाल्यानं तिथं प्रामुख्यानं दत्तात्रय भरणे विरुद्ध नुकतंच भाजपातून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यात सामना रंगणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. म्हणजे इंदापूरात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकते. एबी फॉर्म देण्यात आलेल्या नावांमध्ये उद्गीर विधानसभा मतदारसंघातून संजय बनसोडे यांना फॉर्म देण्यात आला आहे. हडपसरमधून चेतन तुपेंना एबी फॉर्म देण्यात आला आहे. इथं शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे इच्छुक होते. परंतु प्रबळ दावेदारी अजित पवार गटाची राहिल्यानं चेतन तुपे यांचीच उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय. त्यामुळे शिंदे सेनेतून इच्छुक असलेले नाना भानगिरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.. एबी फॉर्म देण्यात आलेल्या यादीत वडगाव शेरीतून सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु या जागेसाठी भाजप आग्रही आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक वडगाव शेरीतून लढलेले भाजपचे जगदीश मुळीक हे यावेळी देखील इथून इच्छुक आहेत. मागच्या निवडणुकीला सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक असा सामना झाला होता. यात सुनील टिंगरे विजयी झाले होते. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. महायुती म्हणून भाजप आणि अजित पवार गट एकत्र आहेत. त्यामुळे सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आल्यानं भाजपचे जगदीश मुळीक काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. वळसे पाटील हे आंबेगावमधून १९९० पासून २०१९ पर्यंत सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आणि आता आठव्यांदा ते रिंगणात आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतर दिलीप वळसे पाटलांनी अजित पवार यांच्याकडे जाणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळू शकते. शहापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या नावाचा समावेश आहे. तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. कोपरगावमधून विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. त्यामुळे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे हे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. काळे आणि कोल्हे कुटुंबात अनेक वर्षांपासून राजकीय अस्तित्वाची लढाई सुरु आहे. यावेळी काळे आणि कोल्हे दोघेही महायुतीत आहेत. कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल हे अद्यापही स्पष्ट नाही. इगतपुरीमधून हिरामण खोसकर, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ, येवल्यातून मंत्री छगन भुजबळ यांना एबी फॉर्म देण्यात आलाय. नंदुरबारमधून भरत गावीत, अहमदपूरमधून बाबासाहेब पाटील, कळवण विधानसभा मतदारसंघातून नितीन पवार, पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक, जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अतुल बेनके यांच्या नावांचा समावेश आहे. तर आष्टीतून बाळासाहेब आजबे आणि मोहोळमधून यशवंत माने यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाटप करण्यात आलेल्या एबी फॉर्ममध्ये प्रामुख्यानं सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, छगन भुजबळ,नरहरी झिरवळ या प्रमुख नेत्यांचा समावेश दिसून येत आहे. यातील बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा सामना पाहायला मिळू शकतो. भाजपने आपली पहिली यादी जाहीर केल्यांनतर अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. अनेकांच्या मनात आपल्याला डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे. तर काही जण बंडखोरीच्या पावित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. अशात अजित पवार यांनी उमेदवार यादी जाहीर करण्याआधी एबी फॉर्म वाटप करणं म्हणजे इच्छुकांमध्ये आणखी नाराजी वाढण्याची शक्यता आहे.