मुंबई | दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून भाजपने महविकास आघाडी विरोधात रान उठवले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. याकूब मेमनला फाशी देण्यात आली आणि त्यानंतर त्याचे मानसन्मानाने दफन झाले, तेव्हा सरकार कोणाचे होते? तेव्हा शिवसेना सरकारमध्ये असली तरी आमचे कितपत ऐकले जात होते, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता भाजपमधील जे नेते आरोप करत आहेत, ते आमच्यावर चिडलेले आहेत की त्यांच्याच पक्षातील अंतर्गत वादामुळे हे सगळे घडले आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करा. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. यावरुन काय तो निष्कर्ष काढावा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
त्याचवेळी बोलताना अदित्य ठाकरेंनी, पेंग्विनसेना म्हणत असाल तर मला त्याचा अभिमान वाटतो अशा शब्दात विरोधकांना उत्तर दिले आहे. भाजपकडून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला पेंग्विनसेना म्हणून डिवचण्यात येते. आदित्य ठाकरे यांच्याच पुढाकाराने राणीच्या बागेत परदेशातून पेंग्विन आणण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आम्हाला पेंग्विनसेना म्हटले जात असेल तर त्याचा अभिमान आहे. राणीच्या बागेत पेंग्निन आणल्यामुळे पर्यटाकांची संख्या वाढली. त्यामुळे तोट्यात असणारी राणीची बाग फायद्यात आली. त्यामुळे पेंग्विनवरुन चिडवले जात असेल तर मला त्याचा अभिमानच आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.