अमरावती | नवनीत राणा यांचा पोलिसांवर आरेरावी करून राडा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. लव्ह जिहाद झाल्याचा गंभीर आरोप करत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. राजापेठ पोलीस ठाण्यात हा गोंधळ घालण्यात आला होता. कॅमेऱ्यासमोर नवनीत राणा यांनी प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी केल्याचा आरोप केला जात आहे. खासदार राणा यांच्या बोलण्यामुळे पोलीस कुटुंब मात्र आता संतप्त झाले आहे.
सर्वांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही, असा इशारा पोलिसाच्या पत्नी आणि शिवसेना पदाधिकारी पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात त्यांनी नवनीत राणा यांना कडक इशारा देत माफी मागण्याचे आवाहन केले आहे.
नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरेच माणुसकी असेल ना, तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग. नाहीतर तुला आता मी सोडणार नाही. तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहेस. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. तुला पोलिसांचे दुःख नाही कळणार. पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरतेस. आता मात्र त्यांची माफी मागावी लागेल, अन्यथा तुला सोडणार नाही, अशा शब्दात पोलीस पत्नी वर्षा भोयर इशारा यांनी दिला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी राडा घातला. आपले कॉल रेकॉर्ड होत असल्याचे देखील आरोप केले. दरम्यान, या प्रकरणातील तरुणी आता सापडली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची स्टंटबाजी समोर आली आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या काळामध्ये अमरावती शहर सुरक्षित नाही. अमरावती शहरात लव जिहादची प्रकरणे वाढत चालली आहेत. काल आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोललो. गणपतीनंतर लवकरच अमरावतीला नवीन पोलीस आयुक्त येईल, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.