नागपूर | महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांनी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्यात येणार असल्याने भाजप इच्छुकांचे चेहरे खुलले असून धडाक्यात उत्सव साजरे केले जात आहे.
नागपूर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून सहा महिने लोटले आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धती करुन निवडणुकीची संपूर्ण तयारी केली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. शिंदेसेना- भाजप युतीच्या सरकारने प्रभाग पद्धती आणि नगरसेवकांची वाढवण्यात आलेल्या संख्येचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे संपूर्ण तयारी वाया गेली. आता नव्याने प्रभाग रचना, आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे. असे असले तरी अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी नोव्हेंबरमध्ये महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे इच्छुक पुन्हा कामाला लागले आहे.
भाजपचे इच्छुक उमेदवार यांनी सर्वच उत्सव धडाक्यात साजरे करणे सुरू केले आहे. मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून भाजपने माहौल तयार केला आहे. कॉंग्रेसनेसुद्धा गौरव यात्रा काढून वातावरण ढवळून काढले आहे. यानिमित्ताने भाजप आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी यात्रेत सहभागी होऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शहरातील असल्याने तीन दिवस भाजपने प्रचाराची पहिली फेरी आटोपली. कॉंग्रेसतर्फे राष्ट्रीय महासचिव तसेच खासदार मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांनी सुद्धा यात्राकाढून कार्यकर्त्यांना कामाला लावले. मात्र यातही कॉंग्रेसची गटबाजी दिसून आली. विधानसभानिहाय गौरव यात्रा काढायच्या होत्या. मात्र उत्तर नागपूरची वेगळी यात्रा काढण्यात आली. यात सहभागी झालेले नेते शहराच्या इतर मतदारसंघातील यात्रेत सहभागी झाले.
महाविकास आघाडी सरकार असताना पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल होणार हे निश्चित होते. त्यानुसार विविध पक्षातील युवा कार्यकर्ते आपल्या वार्डात दावेदारी सिद्ध करण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले होते. लोकांच्या भेटी घेणे सुरु केले होते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन, आंदोलनेही सुरु केली होती. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारनेही शेवटी तीन वार्डांचा प्रभाग जाहीर केल्याने आपण एवढ्या मोठ्या प्रभागात आर्थिक दृष्या टीकू शकत नसल्याचा अंदाज आल्याने या युवा कार्यकर्त्यांनी अपेक्षा सोडली होती. त्यानंतर राज्यातील सत्तांतरानंतर चार वार्डांचा एक प्रभाग ही रचना करण्यात आल्याने यंदा मनपा निवडणूकीचे स्वप्न अनेकांनी सोडून दिले असल्याचे खासगीत बोलून दाखविले आहे.