मुंबई | मला बोलण्यापासून कोणीही अडवले नाही. राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशन असल्याने राष्ट्रीय पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांनी बोलणे अपेक्षित होते. त्यामुळे मी तिथे बोलणे टाळले. पण माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. केवळ मीच नाही तर खासदार वंदना चव्हाण, सुनिल तटकरे आणि इतर राज्यांचे काही पदाधिकारीही वेळेआभावी बोलू शकले नाही. कोणीही कोणावरही नाराज नाही. आता काय स्टॅम्पपेपरवर लिहून देवू का? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रीय अधिवेशनात आलेल्या नाराजीनाट्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले.
अजित पवार मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी फक्त वॉशरुमला गेलो तरी अजित पवार बाहेर गेल्याच्या बातम्या आल्या. मी 1991 पासून राष्ट्रीय पातळीवर जातो. पण तिथे मार्गदर्शन करत नाही. राज्यात कुठे सभा असेल, अधिवेशन असेल, चर्चा असेल तर मी तिथं भाग घेत असतो आणि मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे वस्तुस्थिती आधारित बातम्या देण्याची माध्यमांची जबाबदारी आहे, असा सल्ला देखील पवार यांनी माध्यमांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक बडे नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. तसेच राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याठिकाणी पोहचले होते. मात्र या संपूर्ण अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या न झालेल्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली.