जळगाव | मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणावा; असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच हा प्रकल्प बाहेर जात असेल तर कुठे तरी गाजर दाखवले जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज (ता. १५) जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत चाळीसगाव, पाचोरा व जळगाव येथे मेळावे होणार आहेत. जळगावात आगमन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाबाबत राज्यात आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पडलेली होती. परंतु, राज्यात येणारा प्रकल्प हा दुसऱ्या राज्यात जात असेल तर हे कदापिही खपवून घेणार नाही. यामुळे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून काहीही करा पण हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणा असेही अजित पवार म्हणाले.
हा प्रकल्प बाहेर जात असेल तर कुठे तरी गाजर दाखवल जात असल्याचा आरोप करत हा प्रकल्प आधी आणावा आणि दुसरा प्रकल्प उभारायचा असेल तर उभारा. प्रकल्पासंदर्भात कुणीही राजकारण करू नये. राज्याच्या हिताचे जे जे प्रकल्प असतील ते प्रकल्प राज्यात आले पाहिजे; असे मत पवार यांनी व्यक्त केले.