नागपूर | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला स्पष्ट कौल दिला असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपला राज्यातील 299 ठिकाणी विजय मिळाला असून या ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला असून आपण दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांना सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “राज्यात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी 581 च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून भारतीय जनता पार्टीचे सरपंच 259 ठिकाणी निवडून आले आहेत. या निवडणुकीतही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे सरपंच 40 ठिकाणी निवडून आले आहेत. दोन्हीचा एकत्रित विचार करता पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच लोकांनी निवडून दिले आहेत. या कौलाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.”
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून नव्या सरकारच्या बुलेट ट्रेनने महाविकास आघाडीच्या ऑटो रिक्षावर मात केल्याचे स्पष्ट झाल्याचे आहे. बुलेट ट्रेन सुसाट निघाली आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.