मुंबई | शिंदे गट बंड करुन शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणखी आक्रमक आणि सक्रिय झालेले पाहायला मिळाले. यावेळी शिंदे गटातल्या अनेकांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. नुकतंच शिंदे गटातले आमदार रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. यालाच आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाकरे समर्थक सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदींचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्याला उत्तर दिलं आहे. याशिवाय त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचाही उल्लेख केला आहे. अंधारे म्हणाल्या की, त्यांच्या लग्नाची काळजी करायला त्यांचे आईवडील समर्थ आहेत. त्याची काळजी मिंधे सेनेने करण्याची गरज नाही. अमृताजी पक्षात नाहीत तरी ते त्यांचं मॉडेलिंगचं करियर सोडून इकडं येतात. आम्ही कधी त्याबद्दल काही चिंता व्यक्त केली आहे का? नाही केला ना, काय गरज आहे. त्यांचे यजमान मुख्यमंत्री असताना त्यांच्या शोची विक्री करण्यासाठी पोलिसांना वेठीस धरायचे, मेहनत घ्यायचे ना. कारण ते समर्थ आहेत ते करायला. बँकेत खाती उघडायलाही ते सांगत होते ना. ते समर्थ आहेत, आपण कशाला त्यात पडायचं. ज्याचा त्याचा प्रश्न ज्याला त्याला सोडवू द्या ना.
पंतप्रधान मोदींच्या पत्नीचाही अंधारे यांनी याठिकाणी उल्लेख केला आहे. त्यांच्याविषयी बोलताना अंधारे म्हणाल्या, “बघा, मोदींचं लग्न झालं. त्यांची काहीतरी अडचण होती, त्यांना वाटलं आपण वेगळं राहायचं. पण हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मोदींच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा. मोदींच्या या निर्णयामुळे त्यांच्या कामावर कसं का प्रश्नचिन्ह निर्माण करायचं? आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा काढून तुम्हाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का? तुम्हाला वेदान्ता फॉक्सकॉन परत आणता येणार आहे का? शेतकऱ्यांचे, महिला सुरक्षेचे प्रश्न सोडवता येणार आहेत का?”
आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा हे केवळ बालिश चाळे आहेत.बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आदित्यच्या लग्नाची काळजी घ्यायला त्याचे मायबाप खंबीर आहेत. त्यासाठी रामदास कदमांनी आपलं वधूवर सूचक मंडळ घेऊन लूडबूड करू नये. आम्ही त्यासाठी खंबीर आहोत, असंही सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या.