मुंबई | विविध राज्यातील डझनभर शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात केला होता. हा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वतीने खोडून टाकण्यात आला होता. त्यानंतर आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या नेत्यांची बैठकही पार पडली. शिंदे गटासोबत केवळ २-३ राज्यांचे प्रमुख आहेत, तर बाकी सर्व नेते आपल्यासोबत आहेत, असा दावा ठाकरेंनी केला आहे.
विविध राज्यांतील शिवसेनेचे राज्य प्रमुख आज शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. विविध राज्यातील शिवसेनाप्रमुख सेना भवनमध्ये दाखल झाले. या राज्य प्रमुखांची बैठक शिवसेना भवन येथे आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या काही नेत्यांच्या उपस्थितीत झाली.
यापूर्वी, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर संबंधित नेते अधिकृत नसून, अधिकृत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट देत आपल्यासोबत असल्याचं सांगितल्याचा खुलासाही ठाकरेंतर्फे करण्यात आला आहे. त्याच वेळी गोव्याचे शिवसेनाप्रमुख जितेश कामत यांचा व्हिडिओ समोर आला.
एका व्हायरल पोस्टमध्ये १२ राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात होता. मात्र मी एकनाथ शिंदेंना भेटायलाही गेलो नव्हतो. जे कोण भेटले, त्याविषयी मला माहिती नाही. माझं नाव त्यात घेऊ नये, कारण त्या व्हायरल फोटोत तर मी कुठे दिसतही नाही, कारण मी तिथे नव्हतोच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पद दिलं, मी त्यांच्यासोबतच आहे, असं जितेश कामत यांनी स्पष्ट केलं होतं.