मुंबई | उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केलं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवून आमच्याच पाठित खंजीर खुपसला, तुमच्यात हिंमत होती तर त्यावेळीच तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? असा सवाल फडणवीस यांनी केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अडीच वर्षात मला ते संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी काल केलेलं भाषण निराशाजनक होतं असे फडणवीसांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत निवडून आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत मोदीजींचा फोटो लावून निवडणूक लढवली होती असेही ते म्हणाले. आम्ही लिगली निवडून आलो आहोत. मात्र, तुम्ही आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे फडणवीस म्हणाले. तेव्हा का राजीनामे दिले नाहीत असा सवाला त्यांनी केला.
उद्धव ठाकरे असेही म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक आहे. मी त्यांना एवढेच सांगतो की ‘मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है’ तुम्ही 2019 मध्ये ही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात मला संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.