मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज अमरावतीत समारोप होत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मनसेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. तसेच पक्षांतर्गत मोठे फेरबदल होतील. राज ठाकरे 30 तारखेपर्यंत विदर्भामध्ये पक्ष संघटनेत पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करतील, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. दुसरीकडे, शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केलीय. आता मनसेनेही पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार टोला लगावला. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?, असं शरद पवार म्हणाले होते. आता मनसे आमदार राजू पाटील यांनी पवारांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘आम्ही ‘धन’ से कमी आहोत, पण ‘मनसे’ लई आहोत, असं राजू पाटील म्हणाले. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीत आता येत्या काळात कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी शरद पवारांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल’, असा टोला राजू पाटील यांनी लगावला आहे. ‘आम्ही ‘धन’से कमी आहोत. पण ‘मनसे’ लई आहोत’, असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. संधी सर्वांना मिळते, असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. तसेच शरद पवार यांना ‘आदर देतोय, आदर घ्या’, असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.