दिल्ली | देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून कॉंग्रेसकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत कॉंग्रेस पक्षाची स्थिती बिकट झाली असून पक्षाला नवी उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक वर्ष कॉंग्रेसकडे नेतृत्व नसल्याने त्यांच्यावर टिका केली जात होती. मात्र आता कॉग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीबाबत (दि.२२) रोजी अधिसूचना काढण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवड समितीने ही अधिसूचना काढली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, २४ ते ३० सप्टेंबर या दरम्यान अर्जदारांना अर्ज करता येणार असूनअर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख ८ आँक्टोंबर आहे. निवडणूक बिनविरोध झाली नाही तर १७ आँक्टोंबर रोजी मतदान होणार असून १९ आँक्टोंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
काँग्रेसचे बडे नेते शशी थरुर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दोन्ही जण निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने लढताना दिसण्याची शक्यता आहे. काल अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. यापूर्वी शशी थरुर यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.हे दोन्ही नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. कॉंग्रेसकडून राहुल गांधी यांना अध्यक्षपदासाठी तयार केले जात होते मात्र राहुल गांधी यांनी नकार दिला आहे.
शशी थरुर, अशोक गेहलोत, मुकुल वासनिक यांच्यासह अजून काही जण अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. थरूर यांनी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. थरूर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास त्यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, जर थरुर यांची इच्छा असेल तर ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. कोणीही निवडणूक लढवू शकतात, असे म्हटल्याची माहिती आहे.