मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटातील खासदार भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतील गोरेगाव भागातील नेस्को संकुलात झालेल्या शिवसेना गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधल्यावरुन गवळींवर टीका केली होती. त्यावर बोलताना ‘काल मी त्यांची ताई होते, आज बाई झाले’ असा पलटवार केला आहे.
भावना गवळी म्हणाल्या…
काल मी त्यांची ताई होते, आज बाई झाले, रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करु नये. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदार संघातील एक लाखापेक्षा जास्त बांधवांना राख्या पाठवते, याआधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली, उद्धव साहेब नैराश्यातून अशी विधानं करत आहेत, असं भावना गवळी म्हणाल्या.
उध्दव ठाकरे काय म्हणाले होते ?
शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणले होते “मला पंतप्रधानांचं आश्चर्य वाटतं, स्वतःच्याच पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केलेत, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केलेत, तुम्हाला या सव्वा-दीडशे कोटी लोकसंख्येमध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला? भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर निदान खरं खोटं काय ते बघून घ्या, भाजपने काय माणसं धुवायची लॉंड्री काढली आहे काय?” असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला होता.