मुंबई | उद्धव ठाकरेंनी शिवसेना गटप्रमुखांच्या बैठकीत अमित शाह, नरेंद्र मोदींपासून शिंदे-फडणवीसांपर्यंत सगळ्यांवरच निशाणा साधला. ठाकरेंच्या या भाषणानंतर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पलटवार करताना औकात काढत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी काल गोरेगाव येथील नेस्को संकुलात गटनेत्यांचा मेळावा घेतला. उद्धव ठाकरे गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले. आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे. नंतर खासदार आमदारांची बैठक घ्यायचे. गटनेत्यांच्या बैठकीत केंद्र सरकारकडे वळले. गटनेता विभागाचा असतो, त्यांच्यासमोर केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्याबद्दल बोललेत. ते निराशेतून केलेलं हे भाषणं. मुख्यमंत्री पद गेलं म्हणून हे भाषण आहे”, अशी टीका राणेंनी ठाकरेंवर केली.
“व्यासपीठावर एक खुर्चीवर रिकामी होती, त्यावर संजय राऊतांचं नाव होतं. उद्धव ठाकरेंना अमित शाहांचा मुंबई दौरा इतका का झोंबला. ते गृहमंत्री आहेत, देशात कुठेही जाऊ शकतात. उद्या महापालिकेची निवडणूक लागली, तर तिथेही येऊ शकतात. उद्धव ठाकरे म्हणालेत अमित शाह म्हणतात जमीन दाखवा. त्यांना याचा अर्थ कळला नाही. जमीन दाखवा म्हणजे जमिनीवर या. उद्धव ठाकरे म्हणाले आस्मान दाखवू. उद्धव ठाकरे कुणाच्या जीवावर म्हणताहेत?”, असा सवाल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना केला.