केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. संजय राऊतांप्रमाणे उद्धव ठाकरेही जेलमध्ये जाणार असा गोप्यस्फोट नारायण राणेंनी केलाय. उद्धव ठाकरे कधीच खरं बोलत नाहीत, उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा अशीही टीका राणेंनी केलीय. आपल्याला मंत्रीपद मिळू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना 10 वेळा फोन केला असंही टीकास्त्र राणेंनी सोडलंय.
उद्धव ठाकरे यांनी काल गटनेत्यांचा मेळावा घेतला होता. यात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. याला उत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे निराशेच्या भावनेतून उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं, अशी टीका नारायण राणे यांनी केली. शिवसेनेचा जन्म झाला तेंव्हा उद्धव ठाकरे 6 वर्षाचे होते. ते 1999 मध्ये पक्ष कार्यालयात आले. मी मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंना वाटलं ते सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात. उद्धव ठाकरेंनी पक्ष वाढीसाठी कधी संघर्ष केला का ? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.
गद्दारांना सत्तेचं दूध पाजलं असे उद्धव म्हणतात, मग सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप कोणी खाल्ल, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंची औकात आहे का ? हिंदुत्वासाठी कोणतं काम केलं…? अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. मुंबईवर गिधाडे फिरत असल्याची उपमा उद्धव ठाकरे यांनी दिली. पण तो लबाड लांडगा आहे. किती खोटं बोलतो. खरं कधी बोलत नाही. काल परवा पर्यंत अमित शाहांना फोन करून मला भाजपमध्ये घेऊ नये यासाठी प्रयत्न करत होता असा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी गंभीर आरोप केला.
लांडगा लबाड, खोटारडा असतो. म्हणून मी त्याला लबाड लांडग्याची उपमा दिलीय. बाप पळवणाऱ्याची औलाद फिरतेय असं उद्धव बोलले. पण बापाचे विचार अन् ध्येय धोरण राबवले नाही, साहेब सन्मान करायचे. हा तसा नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं. मुंबई महापालिका धुतलीय यांनी, 15 टक्के टेंडरमध्ये घेतलं. त्यासाठी कलानगरला यांनी ॲाफीस उघडलं. आता आम्ही ठेकेदाराला समोर आणणार. कोणाला किती टक्के दिले ते उघड करणार असल्याचा गौप्यस्फोटही राणेंनी केला.
मी मर्द आहे हे सारखं म्हणतोय, आता उद्धव मर्द आहे का हे एकदा तपासावं लागेल अशी बोचरी टीका करत लवकरच संजय राऊतच्या बाजूला जेलमध्ये उद्धव ठाकरे बसतील, भाजप नेत्यांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर वाकडी नजर टाकली तर डोळे ठेवणार नाही असा इशाराच राणे यांनी दिला. ठाकरे कुटुंबाला संपवायची गरज नाही. ते असं भाषण करत करतच संपतील असा टोलाही राणे यांनी लगावला.