मुंबई | मुंबई हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याची हमी देण्याचे निर्देशही ठाकरे गटाला दिले आहेत. कोर्टानं हा निकाल देताना मुंबई महापालिकेला फटकारलाय. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांच्या दाव्यांबाबत पालिकेला कल्पना होती. तरीही त्यांनी निर्णय़ घेताना कायद्याचा गैरवापर केल्याचा ठपका हायकोर्टानं ठेवलाय.
त्यामुळे महापालिकेलाही झटका बसलाय. तर दुसरीकडे हा निकाल सुनावताना कोर्टानं शिंदे गटाला झटका दिलाय. सदा सरवणकर यांनी केलेली मध्यस्थी याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलीय. ठाकरे गटाला शिवतीर्थावर परवानगी मिळताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत शिवसैनिकांनी राज्यभर आनंद साजरा केला.
न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपली उमेदवारी भगवा झेंडा आहे, आता प्रत्येक महानगरपालिका जिंकायचीय असं सांगत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं.तसंच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, गट पडू देऊ नका असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. उत्साह अमाप आहे, एकजुटही तशीच ठेवा, प्रत्येक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावायचाच आहे असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.