पुणे | राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. या वक्तव्याबद्दल त्यांनी मराठा समाजाची जाहीररित्या माफी मागितली आहे. एवढेच नव्हे तर २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मराठा आंदोलनात सहभागी होईल, अशी घोषणाही सावंत यांनी केली आहे.
सावंत म्हणाले की, “मी एक लाख वेळा मराठा समाजाची माफी मागायला तयार आहे. जर २०२४ पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मी राजीनामा देईल आणि मोर्च्यात सहभागी होईल. हा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालूये. मी पाळण्यातल्या बाळापासून तर ९० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत मी माफी मागायला तयार आहे. माझा समाज आहे मला माफी मागायला काही वाटणार नाही”, असं सावंत यांनी म्हटले.
मात्र, आता तानाजी सावंत यांच्या विधानाची सारवासारव भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली असून तानाजी सावंतांच्या बचावासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत. तानाजी सावंत यांनी एखादं वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करुन ते समोर आणलं जातं. त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचा फरक समजून घेतला पाहिजे. आमच्या रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत नेहमी हेच होतं. पण ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की ते म्हणतात यात काय आहे तसं त्यांना म्हणायचं नव्हतं, असं पाटीय यावेळी म्हणाले.
तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचं होतं की मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजी यांनी दिलं म्हणजे बीजेपी सरकारने दिलं ते हायकोर्टात टिकवलं ते सुप्रीम कोर्टात एक वर्ष टिकवलं मग अडीच वर्षात आंदोलन का केली नाही?. असं तानाजी सावंत यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. माझी हात जोडून विनंती आहे की उठ सूट गैरसमज करुन घेण्याचा काही गरज नाही. त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे की अडीच वर्ष का शांत बसला? त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की आता आपलं सरकार आलंय आपण करुयात.असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली. असं विधान तानाजी सावंत यांनी केलं आहे.